मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील अपेक्षांना मोठा दिलासा मिळण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केले होते. त्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळू लागला. मात्र, सातारा गॅझेट अद्याप लागू न झाल्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता.
याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसह हैदराबाद गॅझेटच्या कार्यप्रणालीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत ठरले आहे की, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर सातारा गॅझेट लागू केले जाईल.
अधिकार्यांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आधी मोठे निर्णय घेणे शक्य नव्हते. आता निवडणुका संपल्यानंतर सातारा गॅझेट अंमलात आणल्यास मराठा समाजाला आणखी मोठा दिलासा मिळणार आहे. उपसमितीने सांगितले की, फक्त गॅझेटच्या इंटरप्रिटेशनच्या बाबतीत लवकरच निर्णय घेण्यात येईल, ज्यामुळे समाजातील गैरसमज दूर होतील. या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होणार असून, मराठा समाजातील विश्वास वाढण्यास आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीस गती मिळण्यास मदत होणार आहे.



