पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यात तिसरा
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील तब्बल 57 मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने थेट तिसरा क्रमांक पटकावत 200 पैकी 170.50 गुण मिळवले आहेत. हा विभाग जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.
या मूल्यमापनात पहिला क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभागाने, तर दुसरा क्रमांक वन विभागाने मिळवला असला, तरी ग्रामीण जीवनाशी थेट निगडित, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तिसऱ्या क्रमांकावर येणे ही मोठी प्रशासकीय कामगिरी मानली जात आहे.
‘नळाला पाणी आणि गावात स्वच्छता’ हे ध्येय प्रत्यक्षात उतरविणारा विभाग
गावागावात नळ पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ गाव अभियान, डिजिटल फाईलिंग, वेळेत प्रशासकीय निर्णय, नागरिकाभिमुख सेवा — या सर्व बाबींमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने वेगळी ओळख निर्माण केली असून त्याचे श्रेय थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीला दिले जात आहे.
काम कागदावर नाही, गावात दिसलं पाहिजे’ ही भूमिका घेऊन त्यांनी प्रशासनाला सातत्याने कामाला लावले आणि त्याचाच परिणाम आज राज्यस्तरावर गुणांकनात दिसून येतो, अशी भावना प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यालाही राज्यात प्रथम क्रमांक
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील जबाबदारी सांभाळत आहेत, त्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामुळे मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वय, शिस्तबद्ध नियोजन आणि गतिमान अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण जळगाव जिल्ह्याने राज्यासमोर ठेवले आहे.
राज्यात ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ची चर्चा
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासारख्या अत्यंत जबाबदारीच्या विभागात राज्यभर समान दर्जाची सेवा, डिजिटल ट्रॅकिंग, लोकसहभाग आणि प्रशासनावर काटेकोर नियंत्रण ठेवत विभागाला अव्वल क्रमांकाच्या यादीत नेऊन ठेवणे, ही बाब इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे आज राज्यभरात ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ म्हणजेच कामात वेग, निर्णयात ठामपणा आणि अंमलबजावणीत शिस्त अशी चर्चा सुरू आहे.
जनतेच्या विश्वासाला मिळाले अधिक बळ
या यशामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग म्हणजे केवळ योजना नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम देणारा विभाग अशी प्रतिमा राज्यात निर्माण झाली आहे. ही कामगिरी म्हणजे केवळ गुणांची नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनमानात सुधारणा घडवणाऱ्या नेतृत्वाची पोचपावती असल्याचे मानले जात आहे.



