प्रजासत्ताक दिनी महिला कर्मचाऱ्याचा ठाम पवित्रा
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला. ध्वजवंदनानंतर झालेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी कार्यक्रमस्थळीच तीव्र आक्षेप घेतला. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात संविधानाचा उल्लेख करताना बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, असा आरोप माधवी जाधव यांनी केला. “संविधान ज्यांच्यामुळे घडलं, त्यांचंच नाव वगळणं ही फार मोठी चूक आहे. संविधानाशी थेट संबंध नसलेल्यांची नावं घेतली गेली, पण बाबासाहेबांचं नाव का नाही?” असा थेट सवाल त्यांनी मंत्र्यांना केला.
या प्रकारानंतर उपस्थित पोलीस व सहकाऱ्यांनी माधवी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना कार्यक्रमस्थळावरून बाजूला नेलं. मात्र, यावेळीही त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “तुम्हीही संविधानामुळे आहात, पालकमंत्रीही संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांनीच समानता दिली, कोणताही जातीभेद नाही हे संविधानाने शिकवलं,” असं त्या म्हणाल्या.
इतकंच नाही तर, “मला सस्पेंड केलं तरी चालेल. वाळूच्या गाड्या उचलेन, मातीचं काम करेन; पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. बाबासाहेबांना संपवायचं काम कोणी करू नये,” अशा ठाम शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
या गोंधळानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. “बाबासाहेबांचं नाव न घेण्यामागे कोणताही हेतू नव्हता. माझी याआधीची भाषणं तपासली तर बाबासाहेबांचा उल्लेख नेहमीच केलेला दिसेल. या भाषणात नाव राहून गेलं. पण जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, हा प्रकार प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी घडल्याने संविधान, बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही मूल्यांवरून पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.



