मुंबई ;- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
विमल अग्रवाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीत परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांची नावं नमूद केली आहेत. या सर्वांविरोधात खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान आरोपींनी विमल अग्रवाल यांच्याकडून ९ लाख रुपये रोख आणि सॅमसंगचे दोन महागडे फोन खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण मिळून ११ लाख ९२ हजारांची खंडणी घेण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.