नाशिक : वृत्तसंस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय वातावरण तापले असतानाच, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संशयातून नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे.
इगतपुरी तालुक्यातील रहिवासी संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील चोरली घाट परिसरात ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपाच्या आधारे काही व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच स्वतःसह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात केवळ अपहरणाचाच नव्हे, तर संघटित गुन्हेगारीचाही संशय अधिक बळावला आहे. तक्रारीतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकारात काही व्यावसायिकांसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा संदीप पाटील यांनी केला आहे. चोरीला गेलेली रक्कम ही मुंबई-ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरूप प्राप्त झाले असून, पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणाच्या तपासात नाशिक ग्रामीण पोलिसांनी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) अशा पाच संशयितांना अटक केली आहे. यापैकी विराट गांधी याला अलीकडेच अटक करण्यात आली असून, अद्याप दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या कटामागील सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, गोवा राज्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी नेण्यात येत असल्याचा बनाव करून जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेला कंटेनर प्रवास करत होता. या कंटेनरमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची रोकड असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही रक्कम लंपास करण्यासाठीच संपूर्ण कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत असून, आता त्याचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलिस दलाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी यासंदर्भात माहिती देताना, निष्पक्ष व स्वतंत्र तपासासाठी एसआयटी नेमण्यात आल्याचे स्पष्ट केले. या तपासात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात पोलिसांचा समन्वय साधण्यात येत असून, तिन्ही राज्यांतील यंत्रणा संयुक्तपणे या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.



