मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार विरोध दर्शवला असतानाच, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना थेट आव्हान देत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बिहार भवन बांधणारच. बिहार भवन बांधण्याचं काम थांबवण्याइतकी ताकद कुणामध्येही नाही,” असे स्पष्ट शब्दांत अशोक चौधरी यांनी सांगितले. तसेच, “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का? फालतू गोष्टी सुरू आहेत. उपचारांसाठी महाराष्ट्रात येणाऱ्या बिहारमधील लोकांसाठी हे भवन उभारले जात आहे. हा देश आहे की कुणाची जबरदस्ती चालणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अशोक चौधरी पुढे म्हणाले की, बिहार भवन हे कोणत्याही राजकीय अजेंड्याचा भाग नाही. “हे भवन बिहारमधील जनतेसाठी असंख्य सुविधा देणार आहे. मानवी गरजांना प्रतिसाद म्हणून हे बांधले जात आहे. भविष्यात इतर राज्यांमध्येही अशा इमारती उभारल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वादावर शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनीही मनसेच्या भूमिकेवर टीका केली आहे. “मनसेकडून केला जाणारा विरोध चुकीचा आहे. ही इमारत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उभारली जात आहे. अशा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची भूमिका काय आहे?” असा सवाल संजय निरुपम यांनी केला. “हा प्रकल्प पूर्णपणे मानवतेशी संबंधित आहे. त्यावर राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही निरुपम यांनी ठणकावून सांगितले. मुंबईत बिहार भवन उभारणीवरून आता राज्याबाहेरील नेतेही आक्रमक झाले असून, येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



