सोलापूर-प्रतिनिधी । भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिली. संबंधित महिलेने गुंगीचं औषध दिल्याचा आरोप देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. एका महिलेने हॉटेलच्या रुममध्ये फोनवर एक व्हिडीओ शूट केलाय. त्यात तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला.
संबंधित महिलेनं ग्रीन टीमध्ये गुंगीचं औषध टाकून माझ्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यानंतर चारित्र्य हननाचा प्रयत्न केला. या प्रकारात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तसंच संबंधित महिलेविरोधात ओशिवरा अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रपिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे असं देखील देशमुख यांनी सांगितले आहे.
यानंतर महिलेचा १७ मिनीटाचा कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाला आहे. त्यात ती म्हणाली आहे की, ‘नाही, आता तू बघच. तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलला?’, असा प्रश्न ती तरुणी विचारते. या ऑडीओ क्लिपमुळे सोशल मीडीयासह सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.