नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधान इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण करण्यात तज्ञ असल्याचा आरोप करत, गेल्या महिन्यात संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान राष्ट्रगीताच्या इतिहासाचा अपलाप करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदी पद्धतशीरपणे महात्मा गांधींच्या स्मृती आणि वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेत राष्ट्रगीतावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी ‘उघड’ झाल्याचा दावाही त्यांनी केला.
आज, २३ जानेवारी २०२६ रोजी देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती साजरी करत असताना, काँग्रेसने ऐतिहासिक संदर्भ पुढे केले. नेताजींनी १९३७ मध्ये वंदे मातरममधील काही ओळींवरील वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्या ओळी पंतप्रधान मोदींनी जाणूनबुजून त्यांच्या उल्लेखातून वगळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेताजींचे पणतू व इतिहासकार सुगत बोस यांच्या लेखनाचा दाखला देत काँग्रेसने म्हटले की, २ नोव्हेंबर १९४२ रोजी बर्लिनमधील फ्री इंडिया सेंटरच्या उद्घाटनावेळी नेताजींनी राष्ट्रगीत म्हणून ‘जन गण मन’ गायले होते. तसेच ६ जुलै १९४४ रोजी सिंगापूरहून प्रसारित संदेशात नेताजींनी महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले होते, असेही पक्षाने नमूद केले.
दरम्यान, संसदेत झालेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्तच्या चर्चेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. प्रियांका गांधी यांनी बंगालमधील निवडणुकांमध्ये वंदे मातरमला राजकीय मुद्दा बनवले जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसने भाजपवर वंदे मातरमच्या नावाखाली राजकारण खेळण्याचा आणि इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला.
याला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. त्यामुळे वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि ऐतिहासिक वारसा या मुद्द्यांवरून राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.



