पुणे : वृत्तसंस्था
गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून भोकरदन तालुक्यातील आन्वा, वाकडी, भिवपूर, दानापूर व पिंपळगाव रेणुकाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र खासगी बाजारात दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नाफेड व खासगी व्यापाऱ्यांच्या दरात १०० ते २०० रुपयांचा फरक असून त्यामुळे शेतकरी खासगी बाजारात माल विक्रीस प्राधान्य देत आहेत.
डीओसी (डीऑइल्ड केक)ची मागणी वाढणे तसेच सरकीचे दर वाढल्याने सोयाबीनला उठाव मिळाला आहे. त्याचबरोबर अमेरिका, ब्राझील व अर्जेंटिना या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदल, उत्पादन अंदाजात घट आणि निर्यातीवरील मर्यादा यामुळे जागतिक बाजारातही सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
मागील तीन वर्षांत सोयाबीनला ३८०० ते ४२०० रुपयांदरम्यानच भाव मिळत होता. उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. आठवडाभरापासून सोयाबीन तेलाच्या दरात वाढ होत असली तरी यंदा दर वाढेपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवलेले सोयाबीन शिल्लक राहिलेले नाही.
आर्थिक अडचणींमुळे ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच कमी भावात विकून टाकले आहे. सध्या केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडेच मर्यादित साठा उपलब्ध असून दरवाढीचा फायदा व्यापारी व साठेबाजांनाच मिळत असल्याची परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतरच दर वाढण्याची जुनी पद्धत यंदाही पुन्हा दिसून येत असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि साठेबाजांचा फायदा होत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



