जळगाव : प्रतिनिधी
किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत सासुरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
सागर दिलीप बिऱ्हाडे (वय ३६, रा. राजमालती नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गेल्या सात वर्षांपासून पत्नी व चार मुलांसह आव्हाणे येथील सासुरवाडीला राहण्यासाठी गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे याचा गावातील काही तरुणांसोबत किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो जमिनीवर कोसळला आणि जागेवरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मारहाणीनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मयत सागर बिऱ्हाडे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



