विजय पाटील जळगाव : जळगाव शहर महापालिकेत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत सत्ता अधिक भक्कम केली आहे. मात्र, या विजयासोबतच पक्षांतर्गत सामाजिक समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहराचे आमदार लेवा समाजाचे आहेत, तसेच महापालिकेतही सर्वाधिक नगरसेवक लेवा समाजाचे असल्याने भाजपात लेवा समाजाला झुकते माप दिले जात असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे मराठा समाज राजकीयदृष्ट्या मागे पडत असल्याची भावना काही स्तरांतून व्यक्त होत आहे.
हीच राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी भाजपकडून महापौर पद मराठा समाजाला देण्याची रणनीती आखली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः ओबीसी प्रवर्गातील मराठा चेहऱ्याला महापौर पदासाठी संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे एकीकडे सामाजिक समतोल राखला जाईल, तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मतदार आधार अधिक मजबूत होईल, असा पक्षातील जाणकारांचा अंदाज आहे.
भारतीय जनता पार्टीने यंदा तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. त्यामुळे महापौर पदासाठीही नव्या, तरुण आणि संघटनात्मक अनुभव असलेल्या मराठा समाजातील नेतृत्वाला पुढे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निर्णयामागे दीर्घकालीन राजकीय गणित असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अंतिम निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे संकेत आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील मराठा समाजातील चेहऱ्याला प्राधान्य देण्याच्या बाजूने सकारात्मक असल्याची चर्चा आहे.
एकंदर पाहता, जळगाव महापालिकेतील महापौर पदाचा निर्णय केवळ पदवाटपापुरता मर्यादित न राहता सामाजिक समतोल, आगामी निवडणुका आणि भाजपची दीर्घकालीन रणनीती यांचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. महापौर पदावर मराठा चेहरा विराजमान होतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



