मुंबई : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर २०२५ चा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींच्या खात्यात मतदानापूर्वीच प्रत्येकी १,५०० रुपये जमा होणार आहेत. तसेच तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१ जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा लाभ जमा करण्यात आला होता. डिसेंबरचा लाभ मकरसंक्रांतीला देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र १५ जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुका असल्याने विरोधी पक्षांनी हरकत घेतल्याने डिसेंबरचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता. आता ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानापूर्वीच महिलांच्या खात्यात हा लाभ जमा होणार आहे.
हा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य व पोषण यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना १ जुलै २०२४ पासून राज्यभर लागू करण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित ३,००० रुपयांचा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऑगस्टमध्ये जमा करून योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला होता.



