विजय पाटील : जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, महापालिकेच्या प्रतोदपदी भाजपाचे नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या गटनेतापदी नगरसेवक प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली असून, उपगटनेतेपदी अनुभवी नगरसेवक नितीन बरडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे तब्बल 46 नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांमध्ये गटनेते व प्रतोद निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
नाशिकमध्ये गटनिर्णय, विभागीय आयुक्तांकडे नोंदणी
भाजपाच्या गटनोंदणीसाठी सर्व नगरसेवक बुधवारी नाशिक येथे रवाना झाले होते. नाशिक येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर महापालिकेच्या गटनेतापदी प्रकाश बालाणी यांच्या नावावर सर्वानुमते एकमत झाले.
या निवडीनंतर भाजपाच्या महापालिका गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. उपगटनेतेपदी महापालिकेतील अनुभवी नगरसेवक नितीन बरडे यांची निवड करण्यात आली.
डॉ. चंद्रशेखर पाटील यांना प्रतोदपदाची जबाबदारी
भाजपाचे प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक असलेले डॉ. चंद्रशेखर पाटील हे महापालिकेत दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करून भाजपाने युवा नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. प्रतोदपदासारखी महत्त्वाची जबाबदारी एका युवा नगरसेवकाकडे देत भाजपाने संघटनात्मक पातळीवर धक्कातंत्राचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महापौर आरक्षण सोडतीकडे लक्ष
दरम्यान, गुरुवारी मंत्रालयात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून, या सोडतीकडे संपूर्ण शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आरक्षणानंतर महापौर पदासाठी कोणाचा दावा बळकट होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाजपाने गटनेते, उपगटनेते व प्रतोदपदाच्या निवडी पूर्ण करत महापालिकेतील सत्तास्थापनेची दिशा स्पष्ट केली असून, आगामी काळात महापालिकेतील कारभार अधिक गतिमान करण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे संकेत या निवडीतून मिळत आहेत.



