नाशिक : प्रतिनिधी
रिक्षा प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर करून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केल्यानंतर वाऱ्यावर सोडून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार जेलरोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात राहुल संतोष यादव (वय २५, रा. बालाजी नगर) याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्षा प्रवासात तिची संशयित राहुल यादव याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. संशयिताने मुलीचा मोबाईल क्रमांक घेत चॅटिंग व संभाषण करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे वचन दिले.
मुलीला विश्वासात घेत संशयिताने सायट्रीक ग्राऊंड, आयोध्या नगर, एकता नगर तसेच ठाकरे मळा, जेलरोड परिसरातील विविध ठिकाणी भेटून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. परिणामी मुलगी गरोदर राहिली. गरोदरपणाची माहिती मिळताच संशयिताने तिच्याशी संपर्क कमी केला व नंतर पूर्णपणे पलायन केल्याचे समोर आले आहे.
संशयिताने लग्नाची तयारी करत असल्याचे भासवत वेळ मारून नेली. मुलगी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होत असताना तिने संशयिताला याची माहिती दिली होती. प्रसुतीनंतर बाळाला पाहण्यासाठी येतो, असे सांगून तो गेला; मात्र तो परतलाच नाही.
दरम्यान, मुलगी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अॅडमिट कार्डवर तिचे वय १७ वर्षे ९ महिने असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयिताचे नाव स्पष्ट झाले असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.



