नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेनेतील सत्तासंघर्षासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही सुनावणी आता शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी शुक्रवारीही सुनावणी होण्याची शक्यता नसल्याचा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर उपरोधक प्रतिक्रिया दिली आहे. “माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अपेक्षेप्रमाणे तारीख पुढे ढकलल्याबद्दल जाहीर आभार!” असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली. यापूर्वी मंगळवारीही त्यांनी ट्विट करून, “37 नंबरचे मॅटर कधी बोर्डावरच येणार नाही. भाबडा आशावाद सोडून ताकदीने लढूया,” असे म्हटले होते. आज पुन्हा ट्विट करत त्यांनी, “आज सुनावणी झाली असती तर मात्र धक्का बसला असता,” अशी टिप्पणी केली.
दरम्यान, विधिज्ञ असीम सरोदे यांनीही ट्विटरवर मत व्यक्त करताना सांगितले की, 37 व्या क्रमांकावर लिस्ट असलेले प्रकरण सुनावणीसाठी रिच होणे कठीण आहे. तसेच, जर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह काढून घेतले गेले, तर मुंबई महापालिकेतील राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले. शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता असून, अनेक नेते उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हाशी संबंधित वादावर सुनावणी अपेक्षित होती. हे प्रकरण सकाळी 11.30 वाजता सुरू होऊन सलग दोन दिवस चालण्याची शक्यता होती. मात्र, अरावली पर्वतरांगांशी संबंधित प्रकरणाला प्राधान्य दिल्याने न्यायालयाने दुपारी 1 वाजता त्या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आणि परिणामी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले सत्तासंघर्ष प्रकरण पुन्हा पुढे ढकलण्यात आले.



