मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र, ही सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील हा वाद राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात असून, त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.
आजच्या सुनावणीसाठी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या दैनिक कार्यसूचीत क्रमांक 37 वर होती. त्यामुळे प्रत्यक्ष सविस्तर सुनावणी होईल की केवळ पुढील तारीख दिली जाईल, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये आधीपासूनच मतभेद होते. न्यायालयाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार सुरुवातीचे क्रमांक ताज्या प्रकरणांसाठी राखीव असतात. त्यामुळे या याचिकेची सुनावणी दुपारच्या सत्रात येण्याची शक्यता होती. मात्र, आधीच्या प्रकरणांवर दीर्घ युक्तिवाद झाल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही.
तथापि, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाकडून प्राथमिक टिप्पणी किंवा दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल घटनाबाह्य असल्याचा दावा करत न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी ॲड. असीम सरोदें यांनी केली आहे.
या सुनावणीचा निकाल राज्यातील राजकीय समीकरणे आणि लोकशाही प्रक्रियेवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याने आता सर्वांचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहे.



