नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेले भाजप नेते नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काल अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच नितीन नबीन यांनी पक्ष संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीसाठीही विनोद तावडे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री व मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांची तेलंगणा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बंगळूर महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप नेते राम माधव, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे भाजपने आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला गती दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षात अनुभवी नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवून निवडणुकीतील विजयासाठी रणनीती आखण्यावर भर दिला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



