मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभरात मनपा निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाचा वाद सुरु असताना आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालींनी शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी तीव्र रस्सीखेच सुरू असून, त्यातूनच नाट्यमय फोडाफोडीचे राजकारण समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसेचे निवडून आलेले नगरसेवक आपल्या गोटात ओढण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण सध्या प्रचंड अस्थिर आणि उत्कंठावर्धक बनले आहे.
निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मंगळवारी कोकण भवनात गटनोंदणीसाठी झालेल्या प्रक्रियेत ठाकरे गटाचे केवळ 7 नगरसेवक उपस्थित राहिले. उर्वरित चार नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने खळबळ उडाली. यापैकी दोन नगरसेवक बेपत्ता असून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उर्वरित दोन नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची अधिकृत नोंदणी केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा संशय असलेल्या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्रही सादर करण्यात आले. हे दोन्ही नगरसेवक गेल्या काही तासांपासून ‘नॉट रिचेबल’ असून, त्यांनी गटनेता निवडीसाठी झालेल्या बैठकीलाही दांडी मारली होती. या प्रकारामुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असून, पक्षाने कठोर भूमिका घेतल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाचे स्वप्नील केणे आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झाले आहेत. हे दोघेही मूळचे मनसेचे असल्याने त्यांच्या घरवापसीकडे राजकीय वर्तुळातून पाहिले जात आहे. या प्रवेशामुळे मनसेच्या नगरसेवकांची संख्या 5 वरून 7 इतकी झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या प्रयत्नांमुळे ठाकरे गटाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या 7 नगरसेवकांसह मनसेच्या 2 नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले आहे. सत्ता स्थापनेआधी कोणताही अनपेक्षित धक्का बसू नये, यासाठी ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 62 हा बहुमताचा आकडा महत्त्वाचा आहे. सध्याच्या स्थितीत शिंदे गटाकडे 53 नगरसेवक आहेत, तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाकडे आता 7 आणि मनसेकडे 7 नगरसेवक शिल्लक आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक नगरसेवक महत्त्वाचा ठरत असून, याच कारणामुळे फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



