जळगाव : प्रतिनिधी
सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने एक संशयित शोरुमध्ये आला. त्याला सेल्समनने दाखविलेल्या पाच चैनपैकी २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची चैन हातचालाखी करीत चोरुन संशयित पसार झाला. चोरी करतांना संशयिताने चैनला असलेले प्लास्टीक रॅपर हे जागेवरच फेकून दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी सुभाष चौकातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अॅण्ड सन्स) या शोरूममध्ये घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुभाष चौकात रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स ही सुवर्ण पेढी असून त्याठिकाणी गणेश काळे (वय ४९, रा. अयोध्या नगर) हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. दि.९ जानेवारी रोजी व्यवस्थापक गणेश काळे हे रात्री नेहमीप्रमाणे स्टॉक जमा करीत असताना चैन काऊंटरवरील १९.३५० ग्रॅम वजनाची २२ कॅरेट सोन्याची चैन कमी असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी सदर काऊंटरवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना त्यामध्ये दि. ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ ते साडेपाच वाजेदरम्यान एक अनोळखी पुरुष चैन काऊंटरवर गेला होता. त्या काऊंटरवरील सेल्समनने त्या ग्राहकाला सोन्याच्या पाच चैन दाखविल्या ग्राहक म्हणून आलेल्या अनोळखी इसमाने सेल्समनने त्याला दाखविलेल्या पाच चैनपैकी एक चैन सदर इसमाने हातात घेतली. त्या चैनीचे प्लास्टिक रॅपर खाली टाकून दिले. त्यानंतर तेथून उठून फ्लोअर मॅनेजर भूषण जैन यांच्यासोबत बोलला आणि शोरूममधून निघून गेल्याचे फुटेजमध्ये कैद झाले आहे. काऊंटरवरील एक चैन कमी असल्याने त्याविषयी व्यवस्थापकांनी सेल्समनला विचारले असता दिवसभरात चैन खरेदीसाठी पाच ग्राहक आले होते. त्यातील चार जणांनी चैन खरेदी केली, मात्र एक जण आपल्याला चैन पसंत नसल्याचे सांगून निघून गेल्याचे | सेल्समनने व्यवस्थापकांना सांगितले.
व्यवस्थापक काळे यांनी घडलेल्या प्रकाराबाबतचे सीसीटीव्ही फुटेज काढून ते पोलिसात दिले. तसेच शनिपेठ पोलीसात तक्रार देखील दिली. त्यानुसार या प्रकरणी व्यवस्थापक गणेश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दि. १९ जानेवारी रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रीराम बोरसे करीत आहेत.



