अमरावती : वृत्तसंस्था
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून “बाबा सिद्दिकीसारखीच नवनीत राणा यांची हत्या करू” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे अमरावतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही नवनीत राणा यांना पत्राद्वारे तसेच फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथे दिलेल्या भाषणानंतर आणि ‘हिंदू शेरणी’ या उल्लेखानंतरही नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा फोनद्वारे धमकी आल्याने अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीत भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्या एका वक्तव्यावरून टीका केली होती. मुलांच्या जन्मासंदर्भातील वक्तव्यावरून झालेला वाद चर्चेत असतानाच, आता थेट पोलिसांना फोन करून धमकी देण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
यापूर्वीही हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीने घाणेरड्या शब्दांत पत्र पाठवून नवनीत राणा यांना धमकी दिली होती. ऑक्टोबर–नोव्हेंबर महिन्यात आलेल्या धमकीच्या पत्रांप्रकरणीही राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



