नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली असून ते भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. मंगळवारी भाजप मुख्यालयात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून नितीन नवीन यांचे स्वागत केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लोकांना प्रश्न पडेल की मोदी इतक्या लहान वयात मुख्यमंत्री कसे झाले, पण मी आजही स्वतःला कार्यकर्ता मानतो. आता नितीनजी माझे बॉस आहेत आणि मी एक कार्यकर्ता आहे.”
राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी नितीन नवीन यांनी दिल्लीतील भगवान वाल्मिकी मंदिर, गुरुद्वारा बांगला साहिब आणि झंडेवालन मंदिराला भेट देत पूजा केली. अवघ्या ४५ व्या वर्षी ते भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी अमित शहा यांची ४९ व्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती.
सोमवारी भाजप मुख्यालयात अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज न दाखल केल्याने नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली. याआधी १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
आपल्या भाषणाची सुरुवात ‘भारत माता की जय’ या घोषणेनं करत नितीन नवीन म्हणाले, “पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पंतप्रधान मोदींचे देशासाठीचे कार्य पाहिले आहे. जनतेच्या भावनांशी जोडले गेलेले नेतेच खरे महान ठरतात, हे त्यांनी आम्हाला शिकवले.”
पंतप्रधान मोदींनी यावेळी घराणेशाहीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “घराणेशाही हा देशासाठी मोठा शाप आहे. काँग्रेससारख्या पक्षांत एकामागून एक कुटुंबातील सदस्य अध्यक्ष बनतात. यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि देशातील तरुणांसाठी राजकारणाचे दरवाजे बंद होतात. म्हणूनच पहिल्यांदाच राजकारणात येणाऱ्या एक लाख तरुणांना संधी देण्याचा माझा संकल्प आहे.” नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी पक्षनेत्यांनी व्यक्त केला.



