चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात शेतातील बांधावर असलेले झाड तोडल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून मारहाण व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघा सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शेताच्या बांधावर असलेले निंबाचे झाड तोडले, या कारणावरून संशयित दोघे पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ करत होते. हे पाहून पीडित महिला शिवीगाळ का करताय, असे विचारत असता संशयितांनी महिलेलाच अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिचा विनयभंग करुन मोबाईल फोन हिसकावत दांड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या पीडित महिलेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याने पीडित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. अर्जात आरोपींकडून वारंवार अश्लील शिवीगाळ, धमक्या देणे व दहशत निर्माण केल्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, पीडितेच्या सुधारित तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार विजय शिंदे करत आहेत.



