नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या दोघांचेही लव्ह मॅरेज झाले होते. हत्या केल्यानंतर काही तासांतच आरोपी पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुमा परिसरातील न्यू हायटेक सिटी येथे घडली. मुस्कान रुग्णालयाच्या वर असलेल्या भाड्याच्या घरात पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सचिन सिंह असून तो फतेहपूर जिल्ह्यातील माहनपुर गावचा रहिवासी आहे. शनिवारी रात्री रडतच तो महाराजपूर पोलीस ठाण्यात आला आणि म्हणाला, “साहेब, मी माझ्या पत्नीचा गळा आवळला आहे. तिचा मृतदेह घरी आहे.”
हे ऐकताच पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
चौकशीत सचिनने सांगितले की, चार महिन्यांपूर्वी त्याने श्वेता सिंह हिच्याशी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केला होता. कुटुंबीय नाराज असल्याने दोघे सुरत येथे गेले. सचिन खासगी कंपनीत काम करत होता. मात्र, काही काळानंतर तो कानपूरला परतला आणि रुमा भागात भाड्याच्या घरात राहू लागला. तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता.
१३ जानेवारीला सचिन फतेहपूर चौडगरा येथे गेला होता. शनिवारी रात्री सुमारे १ वाजता अचानक घरी परतल्यावर त्याने पाहिलं ते दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. पत्नी श्वेता घरात दोन तरुणांसोबत संशयास्पद अवस्थेत होती. हे तरुण शेजारील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
रागाच्या भरात सचिनने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वेता व त्या दोघांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला आणि मारहाण केली. आरडाओरडा झाल्यानंतर शेजाऱ्यांनी 112 वर फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना चौकीत नेले. चौकशीनंतर पोलिसांनी सचिन व श्वेताला समज देऊन घरी पाठवले, तर दोन्ही तरुणांना ताब्यात ठेवले.
घरी परतल्यानंतर सचिन आणि श्वेतामध्ये जोरदार वाद झाला. श्वेताने सचिनला धमकी दिल्याचे त्याने सांगितले. “सकाळपर्यंत त्या मुलांची सुटका करेन. तू मला मारून टाक, पण मी त्यांच्याच सोबत राहणार,” असे श्वेताने म्हटल्याचा दावा सचिनने केला. या वक्तव्याने संतप्त झालेल्या सचिनने रागाच्या भरात श्वेताचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर काही वेळ तो इकडे-तिकडे भटकत राहिला आणि अखेर पोलिसांसमोर जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



