धरणगाव | प्रतिनिधी
“गावचा विकास हाच आमचा ओळख” या ब्रीदवाक्याला अनुसरून धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या भूमिपूजन सोहळ्यात तालुक्यातील सोनवद, अहीरे बु., चामगांव, बाभुळगाव आदी गावांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, ग्रामपंचायत कार्यालये, समाजमंदिरे, स्मशानभूमी रस्ते, गटारे, पथदीप व इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.
कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी
या कार्यक्रमांतर्गत विविध गावांमध्ये सुमारे १ कोटी १५ लाखांपासून ते ९ कोटी रुपयांपर्यंत अंदाजित खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यामध्ये ग्रामांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण,स्मशानभूमी व तेथील पोहोच रस्ते
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय इमारती, सामाजिक सभागृह व इतर नागरी सुविधा,अंतर्गत गटारे व हायमास्ट दिवे यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील, शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामुळे धरणगाव तालुक्यात विकासाची नवी दिशा मिळणार असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.



