लाईव्ह महाराष्ट्र विजय पाटील : १६ जानेवारी – जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश मिळाले असून या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेशदादा चव्हाण व शहराचे आमदार राजुमामा भोळे या जोडगोळीच्या माध्यमातून करण्यात आलेले अचूक नियोजन निर्णायक ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वी जिल्हा दूध संघात सत्तांतर घडवत भाजपाची सत्ता प्रस्थापित करणे तसेच जिल्हा बँक नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळवून दिलेले यश, या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. आमदार चव्हाण यांनी ती पूर्ण ताकदीने व अचूक नियोजनाने पार पाडत पुन्हा एकदा आपली रणनीती यशस्वी करून दाखवली.
गेल्या वीस दिवसांपासून आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव शहरात ठाण मांडून त्यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्यासोबत समन्वय साधत महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील तसेच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संवाद साधत निवडणुकीची दिशा ठरवण्यात आली. सामाजिक व राजकीय समीकरणांचा अचूक अभ्यास करत जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी उमेदवार निवड प्रक्रिया राबविण्यात आली.ज
सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एकमताने निर्णय घेण्याची भूमिका आमदार मंगेशदादांनी बजावली. या संपूर्ण काळात त्यांनी आमदार राजूमामा भोळे यांना भक्कम पाठबळ देत पाठिशी उभे राहिल्याचे चित्र संपूर्ण जळगाव शहरात दिसून आले.
विशेष म्हणजे, मराठा समाजातील प्रभावीन नेतृत्व म्हणून आमदार मंगेशदादा चव्हाण यांना भाजपाने पुढे केल्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकसंघपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहिल्याचे या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राबविलेल्या अचूक रणनीतीमुळे आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या भक्कम साथीतून जळगाव महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला, असे संपूर्ण राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



