जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील सोनवद–अहिरे रस्त्यावर आज दुपारी एक भीषण अपघात घडला असून, या अपघातात बाभूळगाव येथील एकनाथ दयाराम मराठे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या मातीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनवद परिसरातील वीटभट्ट्यांसाठी माती वाहतूक करण्यासाठी या रस्त्यावरून दिवसभरात पन्नासहून अधिक ट्रॅक्टर ये-जा करत असतात. आजही मातीने भरलेला एक ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असताना रस्त्यावरून जात असलेल्या एकनाथ मराठे यांना धडक बसली. धडकेनंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक थेट त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
धरणगाव तालुक्यातील सोनवद–अहिरे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी लाईव्ह महाराष्ट्रशी बोलताना दिली.
दरम्यान, अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी मदतकार्य सुरू केले, तर काहींनी पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. अपघाताची माहिती धरणगाव पोलीस स्थानकाला देण्यात आली असून, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सोनवद–अहिरे रस्त्यावरून होणारी भरधाव ट्रॅक्टर वाहतूक पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे या रस्त्यावर वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.



