आमदार राजूमामा भोळे यांचे मतदारांना आवाहन
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
या रॅलीला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह तरुणाई आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करत पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे व नेत्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले की, “आम्ही विकासाची अजिंठा घेऊन तुमच्या दारात आलो आहोत. जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाला साथ द्या.
त्यांनी प्रभाग क्रमांक १३ ड मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांना घड्याळ या निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
या भव्य रॅलीमुळे प्रभाग १३ मध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.



