जळगाव : प्रतिनिधी
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करताना लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना जळगावातील एमआयडीसी परिसरात घडली. शनिवारी (३ जानेवारी) पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास जळगाव–अजिंठा रस्त्यावरील एमआयडीसी येथील जकात नाक्याजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातून रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मशीनचा मोठा भाग कापण्यात आल्यानंतर आत असलेल्या नोटांनी अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
ही संपूर्ण घटना एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये कारमधून आलेले चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रेही मारल्याचे निदर्शनास आले. मात्र, एटीएम केंद्राची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने पोलिस किंवा बँक यंत्रणेला तत्काळ सूचना मिळाल्या नसाव्यात, असे पोलिसांनी सांगितले. एटीएममधून धूर व आग लागल्याचे एका रिक्षाचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने एटीएमलगत असलेल्या दुकानावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिस व अग्नीशमन दलाला कळविण्यात आले. वेळेत आग आटोक्यात आणण्यात आली.
सदर एटीएममध्ये रोकड भरण्याचा मक्ता एका खासगी कंपनीकडे असून, काही दिवसांपूर्वीच या एटीएममध्ये ११ लाख रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती. ग्राहकांनी किती रक्कम काढली होती व घटनेच्या वेळी एटीएममध्ये नेमकी किती रक्कम शिल्लक होती, याची तपासणी केल्यानंतर जळालेल्या व संभाव्य चोरीच्या रकमेचा अचूक आकडा स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल, असे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.



