विजय पाटील जळगाव- महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध उमेदवारांच्या शर्यतीत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. छाननी प्रक्रियेत भाजपच्या उज्वला बेंडाळे या बिनविरोध झाल्यानंतर, अर्ज माघारीच्या टप्प्यात शिवसेनेने आघाडी घेतली. बुधवारपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत पक्षाने सलग तीन उमेदवार बिनविरोध करून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण केला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधून प्रतिभा गजाजन देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या समोर माजी नगरसेविका प्रतिभा पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने देशमुख यांचा विजय निर्विवाद ठरला. या घडामोडीमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेनेचा तिसरा उमेदवार बिनविरोध करून करिश्मा साधला आहे.
प्रतिमा देशमुख या दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रभागातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळाले असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांसाठी बुधवारपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोर्चा सांभाळला होता. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानापासून सूत्र हलवून त्यांनी पक्षाच्या रणनीतीला दिशा दिली. या रणनीतीचा परिणाम म्हणून २३ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश आले आहे.
महापालिकेतील सत्ता समीकरणात ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. भाजपने सुरूवात केलेल्या बिनविरोध निवडीच्या शर्यतीत शिवसेनेने हेट्रीक करून आपली ताकद दाखवली आहे. या विजयामुळे पक्षाच्या संघटनात्मक एकजुटीचे दर्शन घडले असून, आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या रणनीतीला अधिक बळकटी मिळणार आहे.
स्थानिक राजकारणात बिनविरोध निवड ही केवळ विजयाची नोंद नसून, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे प्रतीक मानली जाते. प्रतिभा देशमुख यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, महापालिकेच्या सभागृहात पक्षाची उपस्थिती अधिक ठळकपणे जाणवणार आहे.



