जळगाव : प्रतिनिधी
मैत्री म्हणून बोलणे असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून १८ वर्षीय तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) दुपारी साडे दोन वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली. या हल्ल्यात जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. दशरथनगर) या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी शुभम रवींद्र सोनवणे (वय २५, रा. चौघुले प्लॉट) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
जय गोराडे हा दशरथनगर येथील रहिवासी असून तो देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीसोबत जयची मैत्री होती. मात्र, तिचे व जयचे प्रेमसंबंध असल्याचा संशय शुभम सोनवणे याला होता. या संशयातून बुधवारी दुपारी जय गोलाणी मार्केटमध्ये असताना शुभम व जय यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि संतप्त शुभमने चॉपरने जयवर सपासप वार केले.
गंभीर जखमी अवस्थेत जय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर रुग्णालयात जयचे मित्र व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, ही घटना घडत असताना एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश चौधरी हे त्या परिसरातून जात होते. त्यांनी शुभम हा जयवर चॉपरने वार करत असल्याचे पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत शुभमला ताब्यात घेऊन शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शुभमला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सुरू असून, शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे.



