जळगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.३० रोजी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह ईच्छुक उमेदवार सकाळी ९ वाजेपासून महापालिका परिसरात अर्ज भरण्याकरीता आले होते. यावेळी अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून गेल्या पाच दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता समर्थकांसह महापालिका परिसरात दाखल झाले. सकाळी ९ वाजेपासून महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावर उमेदवारी अर्ज स्विकारले जात होते. याठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता ईच्छुक उमेदवारांनी रांगा देखील लावल्या होत्या.
मुख्य प्रवेशद्वारातून तिघांनाच प्रवेश प्रत्येक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांसह महापालिकेच्या आवारात येत शक्तीप्रदर्शन करीत होता, त्यामुळे याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांकडून श्रीलेयर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. अर्ज भरण्याकरीता केळव उमेदवार आणि त्यांच्यासोबत सूचक आणि अनुमोदक या दोघांना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जात होते.
एकावेळी एकाच उमेदवाराला प्रवेशद्वारातून आत सोडले जात असल्याने त्याठिकाणी रांगा लागल्या होत्या. दरम्यान, जसजशी अर्ज दाखल करण्याची वेळ संपत होती, तसतसे उमेदवार अर्ज दाखल करण्याकरीता धावपळ करीत होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता देखील मनपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रांगा लागल्या होत्या. तसेच दुपारी ३ वाजेनंतर मनपा इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करुन एकाही जणाला आत सोडले जात नव्हते. ईच्छुक उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत होते. यावेळी समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय पक्षांकडून त्यांन एबी फॉर्म घेवून पदाधिकारी महापालिकेत आले. त्यांनी उमेद्वारांना पक्षाचा एबी फॉर्म देत आपली उमेदवारी पक्की करुन घेतली, त्याकरीता उमेदावरांसह त्यांच्या नातेवाईक महापालिकेच्या परिसरात ठाण मांडून बसले होते



