मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले असून, 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्तपणे लढवणार आहेत.
युतीची घोषणा करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठा दावा केला. “मुंबई महापालिकेवर मराठी माणूसच महापौर होईल आणि तो आमचाच असेल,” असे ठामपणे सांगत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपाला कोणी ओळखत नव्हते, आम्हीच त्यांना खेडोपाडी पोहोचवले. आज ज्यांना मोठे केले, तेच आमच्यावर वार करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले आहेत. इतकी वर्षे लढाई लढलो, मुंबई कोणालाही आपल्यापासून हिसकावून घेता येणार नाही,” असेही ते म्हणाले.
भाजपावर आरोपांची झोड उठवत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाने केवळ युती तोडलेली नाही तर शिवसेना संपवण्याचा डाव रचला आहे. “माझा एकही माणूस फुटता कामा नये. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण निष्ठा विकू नका,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची एकजूट, मराठी अस्मितेचा मुद्दा आणि भाजपविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.



