जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंदुर्णी जवळ असलेल्या मोराड (ता. जामनेर) येथे मुलगाच हवा या हट्टापायी जन्मदात्या पित्याने अवघ्या तीन दिवसांच्या आपल्या चिमुकल्या लेकीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) याला यापूर्वी तीन मुली असून चौथ्यांदा मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा मुलगीच झाल्याचा राग मनात साठवून ठेवत आरोपीने १४ नोव्हेंबर रोजी आपल्या तीन दिवसांच्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची हत्या केली. सुरुवातीला या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती.
मुलीचा मृत्यू आईच्या हातातून पडल्यामुळे झाल्याचे सांगत आई-वडिलांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांचे जबाब, डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालातील तफावत आणि संशयास्पद बाबी लक्षात आल्याने शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांनी सखोल चौकशी सुरू केली.
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शेंबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कसून चौकशीत अखेर जन्मदात्या पित्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता आरोपी कृष्णा राठोड याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३४९ भा. न्या. सं. कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मुलगा-मुलगी समान असल्याची जाणीव वाढत असल्याचे दावे केले जात असतानाच, केवळ मुलगाच हवा या विकृत मानसिकतेतून एका पित्याने आपल्या पोटच्या लेकीचा जीव घेतल्याची ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी ठरली आहे. केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सारख्या उपक्रमांतून जनजागृती केली जात असली तरी समाजातील बुरसटलेली मानसिकता अद्याप बदललेली नाही, हेच या अमानुष घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्हाभरातून या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.



