मुंबई : वृत्तसंस्था
भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका करत राज ठाकरे यांच्या टोमण्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी ठाकरे बंधूंप्रमाणे कागदी वाघ नाही, तर खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा आणि लोकसभेत गेलो आहे,” असे म्हणत दानवेंनी राजकीय वातावरण तापवले आहे.
ठाकरे गट आणि मनसे यांची बुधवारी बहुप्रतिक्षित युती जाहीर झाल्यानंतर या युतीवर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंनी टीका केली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी “उत्तरे देवाला दिली जातात, दानवांना नाही,” असा टोला लगावला होता. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दानवेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही निशाणा साधला.
दानवे म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र पुढे पुन्हा विभक्त होण्याची वेळ येऊ नये, असे त्यांनी वागावे.” तसेच 2019 आणि 2024 च्या निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती ही अनैसर्गिक होती, असा आरोपही त्यांनी केला. “त्यांचे अडीच वर्षांचे सरकार जनतेला आवडले नाही. त्यामुळेच राज्यात सत्तांतर झाले आणि त्यांचे अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले,” असे दानवे म्हणाले.
युतीची पत्रकार परिषद सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याकडेही दानवेंनी लक्ष वेधले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर “भाजपात कुणी विचारत नाही” अशी टीका केल्यावर दानवेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
“भाजपने मला सभापती, आमदार, खासदार, दोन वेळा केंद्रीय मंत्री आणि राज्य पक्षाध्यक्ष केले. मला कुणी विचारत नसते, तर हे शक्य झाले असते का? माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला आहे,” असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “मी काळा बुरखा घालून, शेपटी खाली घालून विधान परिषदेत गेलो नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
“मी खरा वाघ आहे, कागदी वाघ नाही. निवडणुकीनंतर हे पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत, हे प्रचारादरम्यान मला स्पष्ट दिसत होते. पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचेही अस्तित्व राहणार नाही, म्हणूनच ते पक्ष सोडत आहेत,” असा दावा दानवेंनी केला.
मात्र शेवटी त्यांनी “दोन्ही भावांवर एकाचवेळी टीका नको. त्यांना एकत्र येऊ द्या,” असे म्हणत आपली भूमिका मांडली. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.



