मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी). देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.
याच पार्श्वभूमीवर काल मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अनेक वर्षांच्या मतभेदांनंतर ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — एकत्र आले असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेसह बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या राजकीय घडामोडींमुळे एकीकडे चर्चांना उधाण आले असतानाच, दुसरीकडे विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे आणि हटके भूमिकेमुळे ओळखले जाणारे सदावर्ते हे ठाकरे बंधूंवर सातत्याने टीका करताना दिसतात. मात्र यावेळी त्यांच्या वक्तव्यांपेक्षा त्यांच्या एका अनोख्या खुर्चीचीच अधिक चर्चा सुरू झाली आहे.
सध्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये वास्तव्यास असलेले गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यालय याच इमारतीसमोर आहे. या कार्यालयात ते नियमितपणे पत्रकार परिषद घेत असतात. आतापर्यंत साध्या खुर्चीवरून संवाद साधणारे सदावर्ते आता मात्र कमळाच्या रचनेवर आधारित, महाराजांच्या सिंहासनासारखी भासणारी भव्य खुर्ची वापरताना दिसत आहेत. ही खुर्ची सध्या माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
या कमळसदृश खुर्चीमागचा नेमका हेतू काय, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सदावर्ते हे अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उघडपणे प्रशंसा करत असल्याने, ही खुर्ची एखाद्या राजकीय संकेताकडे इशारा करते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत सदावर्ते यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
दरम्यान, मूळ नांदेड जिल्ह्यातील असलेले गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे शिक्षण घेतले. एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. 2018 मध्ये मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे ते राज्यभर चर्चेत आले. ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील हे विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर सातत्याने व्यक्त होत असतात.
ठाकरे बंधूंची युती, बीएमसी निवडणुकीचे रणशिंग आणि सदावर्तेंची ही ‘राजेशाही खुर्ची’ या सर्व घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणाला नवी धार मिळाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.



