जळगाव | विजय पाटील
गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती होणार की नाही होणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर पूर्णविराम मिळालेला असून महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिंदे सेना हे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत अजून चर्चा बाकी असल्यामुळे कोणाला किती जागा मिळणार याबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे निवडणूक प्रमुख तथा आमदार सुरेश भोळे, निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, भाजपचे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे प्रमुख नेते उपस्थित होते.
भाजप ५५ जागांवर लढणार
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तसेच महापालिकेतील भाजपचे 2018 मधील विजयी झालेल्या उमेदवारानुसार जागांवर उमेदवार देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित जगांवर शिंदे सेनेच्या किती वाटेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेला येता हे येत्या दोन दिवसात समजणार आहे.
विरोधकांपुढे आव्हान
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिंदे सेना युतीमुळे महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली असल्याचे चित्र असल्यामुळे विरोधकांमध्ये महायुतीचे वर्चस्व राहण्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधकांपुढे एका प्रकारे मोठ्या आव्हान महायुती करणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार की एकतर्फी होणार अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आता रंगलेली आहे.



