ठाणे : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे जेलची हवा खाऊन चर्चेत आलेला तडीपार गुंड मयूर शिंदे याला अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. मकोका अंतर्गत आरोपी असलेल्या मयूर शिंदेच्या भाजप प्रवेशावर यापूर्वी तीव्र टीका झाल्यामुळे हा प्रवेश थांबवण्यात आला होता. मात्र, ठाणे महापालिका निवडणूक जवळ येताच मंगळवारी सायंकाळी हा पक्षप्रवेश उरकल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने या प्रवेशाचा फारसा गाजावाजा टाळला. ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि काही निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मयूर शिंदेचा प्रवेश पार पडला. या प्रवेशाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे, मयूर शिंदेचा भाजप प्रवेश यापूर्वी मोठ्या थाटामाटात होणार होता. आर. जे. ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर बॅनर झळकले होते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार होता. मात्र, मकोका प्रकरणातील आरोपी असलेल्या गुंडाला भाजपने प्रवेश दिल्याचा आरोप झाल्यानंतर तीव्र टीका झाली. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी ऐनवेळी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि प्रवेश स्थगित करण्यात आला होता.
पक्षप्रवेश थांबल्यानंतर भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी “पक्षात काम करण्यासाठी प्रवेशाची गरज नाही” असे वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे मयूर शिंदेसाठी भाजपचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले होते. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे कारण पुढे करत प्रवेश तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे हा प्रवेश केवळ वेळेचा प्रश्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.
मयूर शिंदेवर हत्या, खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी भांडुप परिसरात राहत होता, मात्र पोलिसांनी त्याला तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात स्थायिक झाला. 2017 मध्ये त्याने शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती, पण संधी न मिळाल्याने तो नाराज झाला होता. 2023 मध्ये खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो सातत्याने वादग्रस्त चर्चेत राहिला. गेल्या काही दिवसांपासून तो भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि व्यासपीठावर दिसत असल्याने त्याचा पक्षप्रवेश अटळ असल्याची चर्चा होती.



