मुंबई वृत्तसंस्था :
“कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” या भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात आज ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा झाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
युतीची घोषणा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असणार.” या घोषणेसह त्यांनी महापालिका निवडणुकीच्या रणशिंगाचा निनाद केला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही दीर्घकाळापासूनची जनभावना आज राजकीयदृष्ट्या साकार झाल्याचे चित्र आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “कोण किती जागा लढवणार, आकडे काय असतील हे आत्ता सांगणार नाही. मात्र जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांना दोन्ही पक्षांची संयुक्त उमेदवारी असेल.” सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत त्यांनी “निवडणूक उमेदवार पळवणाऱ्या टोळ्या” असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. दरम्यान, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या “उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल” या विधानावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “उत्तरे देवांना द्यायची असतात, दानवांना नाही.” या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
भाजपकडून युतीवर टीका सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावत, “माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. वेळ आली तर ‘लाव रे तो व्हिडिओ’ 2.0 पाहायला मिळेल,” असा इशाराही दिला. या युतीमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.



