महापालिकेत उमेदवार-कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा कडक बंदोबस्त
जळगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला मंगळवारी (दि. २३) अधिकृत सुरुवात झाली असून सकाळपासूनच महापालिकेच्या इमारतीत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. नामनिर्देशन अर्ज मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रभागनिहाय तब्बल ७७७ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी दहा वाजताच अनेक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या इमारतीत दाखल झाले. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत मोठी गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह इमारतीतील दुसऱ्या आणि अकराव्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरही उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी नियमानुसार प्रवेश देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान, अनेक उमेदवारांची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी विविध विभागांत चांगलीच धावपळ सुरू होती.
पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याने येत्या काही दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आणखी वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारांमध्ये असलेली तीव्र स्पर्धा आणि निवडणुकीची चढाओढ या आकड्यांतून स्पष्टपणे दिसून येत आहे.



