फिनाइल प्राशन; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात २२ डिसेंबर रोजी विवाहिता सासरी नांदत असतानाच तिच्या माहेरी तलाकची नोटीस पाठविण्यात आल्याने मानसिक त्रासातून विवाहितेने फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा पती आकीब शेख जहीर याने भुसावळ येथील माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याचे तिच्या आईने फोनद्वारे कळविले. या घटनेमुळे व्यथित झालेल्या विवाहितेने सासू वैदा नाज शेख यांना याबाबत जाब विचारला असता, “माझ्या मुलाने दुसरे लग्न केले आहे, तू माहेरी निघून जा,” असे अपमानास्पद उत्तर देण्यात आले. या मानसिक छळामुळे विवाहितेने फिनाइल प्राशन केले. सासूने तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता अर्धे फिनाइल विवाहितेच्या अंगावर सांडले. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती आकीब शेख जहीर, सासरे जियाउद्दीन शेख, सासू वैदा नाज शेख व नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.



