जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याच्या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. अर्ज प्रक्रिया सुरू होताच इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र महापालिका परिसरात पाहायला मिळाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याने, अर्जात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यास प्राधान्य दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध प्रकारचे दाखले व कागदपत्रे आवश्यक असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उमेदवारांनी लवकर हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक उमेदवार संभ्रमात असले तरी तयारीला वेग देत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला असून, परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनीही उमेदवारी अर्ज घेत मैदानात उतरल्याने निवडणूक वातावरण अधिक तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता असून, जळगाव महापालिका निवडणूक कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


