नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शेख हसीना विरोधी नेत्यांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. खुलना येथे सोमवारी दुपारी नॅशनल सिटिजन्स पार्टी (NCP) चे नेते मोहम्मद मोतालेब शिकदर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बांगलादेशी माध्यमांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी मोतालेब शिकदर यांच्या डोक्याला लक्ष्य करत गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी अनिमेष मंडल यांनी सांगितले की, गोळी एका कानाजवळून शरीरात शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. सुदैवाने गोळी मेंदूपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास मोहीम सुरू आहे.
मोहम्मद मोतालेब शिकदर हे NCP चे खुलना विभागाचे प्रमुख असून पक्षाशी संलग्न असलेल्या ‘NCP श्रमिक शक्ती’ या कामगार संघटनेचेही ते आयोजक आहेत. कामगार रॅलीच्या तयारीदरम्यानच हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेख हसीना सरकारच्या पतनानंतरही देशात सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारामुळे बांगलादेश पुन्हा अस्थिरतेच्या दिशेने जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


