पारोळा : प्रतिनिधी
मुलीला पळवून नेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मुलगा अमोल पाटील हा १६ डिसेंबर रोजी गावातील एका मुलीला पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही घरी परत न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. मुलगी घरी न आल्याचा राग मनात धरून संशयित कल्पेश पांडुरंग राजपूत, ज्ञानेश्वर भागवत राजपूत आणि अक्षय शंकर पाटील (सर्व रा. कन्हेरे, ता. पारोळा) यांनी १७ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या घरात घुसून आग लावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या आगीत घराचा मुख्य दरवाजा, घरातील संसारोपयोगी साहित्य, अंगणात उभी असलेली मोटारसायकल तसेच शेतीविषयक व कुटुंबातील सदस्यांची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.


