मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सकाळपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे.
पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएमद्वारे टप्प्याटप्प्याने मतमोजणी होणार आहे. मतमोजणीपूर्वी पोस्टल बॅलेटमधील मतांचा आढावा घेण्यात येतो. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपने राज्यभरात मोठी आघाडी घेतली असून, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे पुढील स्थानावर आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार महायुती 150 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचे तुलनेने चांगले प्रदर्शन दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्यपातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन परस्परविरोधी राजकीय आघाड्या असल्या, तरी स्थानिक स्तरावर वेगळीच राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत युती करताना दिसले, तर काही ठिकाणी थेट सत्तेतील मित्रपक्षांमध्येच चुरशीची लढत झाली. त्यामुळे या निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात वेगळेच संकेत दिले आहेत.



