वाशीम : वृत्तसंस्था
वाशिम येथील भाजपच्या एका उमेदवाराकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित भाजप उमेदवाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना वाशिम जिल्ह्यातील लाखाळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता घडली. ठाकरे गटाचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण डोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे याने निवडणुकीच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रवीण डोळे हे आपल्या मित्रांसोबत चर्चा करत असताना सतीश वानखेडे तेथे आला. निवडणूक आणि मतदानाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद वाढत गेला.
वाद तीव्र झाल्यानंतर सतीश वानखेडे याने प्रवीण डोळे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच वानखेडे आणि त्याच्या समर्थकांनी डोळे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनाही मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर वाशिम शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार सतीश उर्फ गल्ला वानखेडे याच्याविरोधात मारहाण, धमकी देणे आणि प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच सतीश वानखेडे फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, निवडणूक काळात घडलेल्या या घटनेमुळे वाशिम शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. ठाकरे गटाने या पार्श्वभूमीवर मतदारांना कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


