जळगाव मनपाच्या प्रभारीपदी आ.मंगेश चव्हाण
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदेची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या पत्रानुसार आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जळगाव भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेत शतप्रतिशत भाजपची सत्ता आणण्याच्या उद्देशाने आमदार चव्हाण हे आतापासूनच ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. संघटन मजबूत करणे, पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे.
याआधी जळगाव जिल्ह्यातील विविध नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये महायुतीला योग्य न्याय देत आमदार मंगेश चव्हाण यांनी समन्वयाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी न राहता विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुती अखंड ठेवून भाजपला सत्तास्थानी नेण्यात आमदार मंगेश चव्हाण कितपत यशस्वी ठरतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


