भुसावळ : प्रतिनिधी
जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. यात उल्हास गणेश पाटील (वय ३९) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरु आहेत. हा प्रकार व्यापारी संकुलाजवळील पानाच्या टपरीवर लुटमारीच्या प्रयत्नातून झाल्याचे समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खळवाडी पुलाच्या बाजूला असलेल्या संकुलाजवळ असलेल्या पानाच्या टपरीवर बुधवारी रात्री चार अज्ञात तरुण आले. त्यांनी टपरीवर गोंधळ घातला. त्यातील एकाने रोकड हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उल्हास गणेश पाटील याने त्यास विरोध करत हटकले. त्याचवेळी चौघांपैकी एकाने बंदूक काढून पाटील यांच्यावर गोळी चालवली. ती गोळी उजव्या खांद्याला लागली. गोळीबारानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी तत्काळ जखमी उल्हास पाटील यास खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला जळगाव येथे हलवण्यात आले. अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत आणि फॉरेन्सिक पथकाने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास सुरु आहे



