बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना आता सोने चांदी, रोकड मिळाली नाही तर ते घरातील पीठ आणि हिवाळ्यात बनविल्या जाणाऱ्या मेथीच्या लाडूंवरही डल्ला मारत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे एकाच रात्री सात घरफोड्या झालेल्या मनूर येथे यामुळे संतापासह थोडी गंमतही केली जात आहे.
१४ ऑक्टोबर रोजी नाडगाव येथे चार घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २५ तोळे सोने लांबविले. त्यानंतर ३० ऑक्टोबरला पुन्हा नाडगावात चार घरे फोडत दोन लाख रुपयांची रोकड व पाच तोळे सोने चोरले. पाच नोव्हेंबरला सोनोटी-नाडगाव शेतशिवारातून ११ शेतकऱ्यांच्या सुमारे हजार मीटर केबल चोरीस गेल्या. ३ डिसेंबरला शहरातील व्यापारी संकुलातील दोन दुकाने फोडण्यात आली.
मंगळवार, १६ डिसेंबर रोजी रात्री मनूर गावात सात घरे फोडून ३० ग्रॅम सोने, ३५ भार चांदी व ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी नेली. विशेष म्हणजे विठ्ठल शेळके यांच्या घरातील मेथीचे अर्धा डबा लाडू आणि गव्हाचे पीठही चोरट्यांनी सोडले नाही. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले असले तरी अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे


