नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मथुरा येथील यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माइलस्टोन क्रमांक १२७ येथे सात बस आणि तीन कार एकमेकांवर आदळल्या. या अपघातानंतर काही वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या भास्करच्या वार्ताहरांना काही बसमध्ये मानवी शरीराचे अवयव अडकलेले आढळले. एका तरुणाने बसमधून आठ ते नऊ मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले. जळालेले अवशेष १७ प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रुग्णालयात पाठवण्यात आले असून डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार आहे.
या भीषण अपघातात किमान ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुमारे २० रुग्णवाहिकांमधून १५० हून अधिक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे सहा तास चाललेल्या बचावकार्यांनंतर ढिगारा हटवण्यात आला. अपघातानंतर काही काळ यमुना एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, मात्र साफसफाईनंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
प्रत्यक्षदर्शी भगवान दास यांनी सांगितले की, धुके प्रचंड असल्यामुळे अचानक एका बसचा वेग कमी झाला आणि मागून येणारी वाहने एकामागोमाग एक धडकली. टक्कर इतकी भीषण होती की बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज झाला. अनेक प्रवासी जीव वाचवण्यासाठी बसच्या खिडक्या तोडून बाहेर उड्या मारताना दिसले.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.



