भाजप, शिंदे गटाच्या मुलाखती..!
विजय पाटील : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जळगाव शहरात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तर १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया तर 16 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान निवडणुकीचे वातावरण तापले असून आज भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या मुलाखती प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. यात मुलाखती देणाऱ्या इच्छुक उमेदवारांना प्रभागातील विविध प्रश्न व तुम्ही किती खर्च करू शकता असे प्रश्न देखील विचारना झाल्याने निष्ठावंत व अनेक वर्षापासून कार्य करणाऱ्या उमेदवार इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात पैसे असलेल्यांनाच उमेदवारी मिळेल का असा मनात प्रश्न निर्माण झाले असल्याचेही दिसून आले.
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून प्रशासकीय पाठोपाठ राजकीय तयारीलाही वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवारी जी.एम. फाउंडेशनच्या कार्यालयात वस्त्रोद्योग मंत्री तथा निवडणूक प्रभारी संजय सावकारे यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शहराचे निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे, मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, निवडणूक संयोजक विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. भाजपातर्फे प्रभागनिहाय २०० हून अधिक ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रात्री उशीरापर्यंत घेण्यात आल्या.
शिंदे गटात ईच्छुकांची भाऊगर्दी
शिवसेना शिंदे गटात देखील सोमवारी केमीस्ट भवन येथे ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शाम कोगटा हे उपस्थित होते. यावेळी सुमारे 300 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, सर्व उमेदवारांच्या सखोल मुलाखती घेण्यात आल्या.
ठाकरे गटासह राष्ट्रवादीचेही इच्छुक उमेदवार भाजपच्या मुलाखतीसाठी
भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती दरम्यान मोठ्या प्रमाणात पक्ष कार्यालयात गर्दी झाल्याची दिसून आले. यावेळी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी चे देखील इच्छुक उमेदवार भाजपच्या पक्ष कार्यालयावर मुलाखतीसाठी दिसून आले. त्यामुळे एकच चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये झाली होती.



